शुक्रवार, १० जुलै, २०१५

जाने वो कैसे लोग थे..

खूप कमी गोष्टी अशा असतात की त्या आपल्या आयुष्यात येतात, सवयीच्या होतात.. आणि काही काळानंतर आपल्याही नकळत आपल्या अस्तित्वाचाच एक भाग होऊन जातात.

एका आंतरजाल कट्ट्यावर गुरूदत्तबद्दल चर्चा करताना लक्षात आलं, आपण 'प्यासा'चा विचार त्यातल्या गाण्यांशिवाय करूच शकत नाही. आणि मग डोक्यात प्रकाश पडला.. साहिर! साहिरची गाणी, ही गोष्ट माझ्या आयुष्यात वर उल्लेखलेल्या गोष्टींमध्ये फिट्ट बसणारी आहे.


साहिरचा जन्म पंजाबातल्या लुधियाना नावाच्या शहरातला. आईवडील विभक्त झाल्यानंतर लहानपणीच गरीबीचे खडतर आयुष्य त्याच्या वाट्याला आले. परंतु याच काळातील अनुभवांनी त्याच्यातल्या कवीला समृद्ध केले. साहिरच्या बर्‍याच कवितांमध्ये डोकावणारी शोषित आणि पीडीत स्त्री ही त्याच्या स्वतःच्या आईचं प्रतिबिंब आहे असं वाटल्याखेरीज राहत नाही. कॉलेजमध्ये असताना साहिर त्याच्या गजला आणि कवितांसाठी प्रसिद्ध होताच. पण तिथून काही कारणामुळे निलंबित झाल्यावर त्याने लाहोरमध्ये आपले बस्तान बसवले. याच काळात साहिरचा पहिला उर्दू काव्यसंग्रह 'तल्खियाँ' प्रकाशित झाला आणि साहिर थोरामोठ्या कवींच्या पंक्तीला जाऊन बसला.


समाजामधल्या दांभिक प्रवृत्तींची साहिरला चीड होती. तो स्वभावतःच अस्वस्थ आणि बंडखोर होता. मुंबईला यावे लागल्यावरदेखील त्याने आपल्या मित्राला सांगितले होते - 'मुंबईला माझी गरज आहे'! पण कोणत्याही सच्च्या कलाकराप्रमाणे साहिर आतून अतिशय भावूक आणि संवेदनशीलही होता. त्याच्या याच स्वभाववैशिष्ट्यांचे विलक्षण मिश्रण त्याच्या गीतांमध्ये दिसते. अत्यंत आर्त, भावानप्रधान पण तितकीच क्रांतिकारी कविता हे साहिरचं खास वैशिष्ट्य! तो जितका दोन प्रेमी जीवांचा कवी होता, तितकाच तो कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याचा किंवा सीमेवर लढणार्‍या जवानाचादेखील कवी होता. आणि म्हणूनच त्याच्याच सारखा कवी हे लिहून जातो:

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया
ये इन्सानके दुश्मन समाजों की दुनिया
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया 
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है..

साहिरच्या काव्यातली ही गूढ, अनाकलनीय ओढ एकदा जाणवली की आपण आपोआप त्याला आपल्या मनातला एक कोपरा कायमचा बहाल करून टाकतो! 

साहिरचा सच्चेपणा त्याच्या प्रत्येक गीतात, कवितेत दिसतो. शब्दांचे खेळ करत बसण्यापेक्षा विषयाला थेट भिडणारी कविता हा साहिरचा विशेष गुण. रांगड्या शब्दात तो आपल्याला सांगतो - 'औरत ने जनम दिया मर्दोंको, मर्दोंने उसे बाज़ार दिया'. आणि तोच साहिर 'वो सुबह कभी तो आयेगी' असा आशेचा किरण दाखवून जातो. 'कल किसने देखा है, कल किसने जाना है' सांगून 'हर फिक्र को धुएँमें' उडवत चालत राहण्याचा संदेश देतो. 'मन रे तू काहे न धीर धरे' असं विचारणारा उदास साहिर, 'ए मेरी जोहराजबी' सारखे काही हलकेफुलके क्षणही पदरात टाकून जातो! 

मग कधी कधी प्रश्न पडतो, यातला खरा साहिर कोणता? 'कभी कभी' सारखं उत्कट प्रेमकाव्य लिहिणारा? 'संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे?' असा आपल्याला हसत विचारणारा? की, 'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इन्सान की औलाद है, इन्सान बनेगा' असा ठणकावून सांगणारा? शेवटी कळतं, तो आपल्याला जितका गवसेल, तितका तो खरा!

असा हा वेडा पीर जाता जातादेखील आपल्याला दुनियेचं शाश्वत सत्य शिकवून गेला:

कल और आएँगे नग्मों की खिलती कलियाँ चुननेवाले
मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले..


हमसे बेहतर सुननेवाले तो कई है साहिर.. तुमसे बेहतर कहनेवाला शायद अभी भी जन्मा नही!